आठवडा बाजार | BizBalloon
×

आठवडा बाजार

“गो सरू , चल आवर गो पटापटा..आज शुक्रवार असा ,माका बाजाराक जावचा हा .” सुरेखा आपल्या लेकीला सांगत होती ..आठवडा बाजार म्हणजे तिच्यासाठी खास दिवस..”आज देवगडाक जावक मिळतला ” म्हणून ती खुश...कारण आठवड्याचे बाकी दिवस मरमर घरातली आणि बाहेरची कामं केल्यावर येणारा शुक्रवार म्हणजेच फक्त तिच्यासाठी थोडासा विरंगुळ्याचा दिवस..
खर तर आठवडा बाजार म्हणजे आमच्यासारखी लोकं ताजी भाजी मिळते म्हणून जातात आणि भाजी घेऊन परत येतात ….पण कित्येक लोकांसाठी मात्र हा खूप विशेष दिवस असतो..
गावात राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या सुरेखासारख्या कित्येक बायका स्वतःच्या परसात तयार झालेल्या अनेक गोष्टी म्हणजे गावठी भाज्या , फळं, कणग्या ,सुरण ,नारळ ,फुलं ,केरसुण्या आणि अस बरच काही घेऊन विकायला बसतात आणि मिळालेल्या पैशातून आठवड्याचा बाजार (सामान) घेऊन घरी जातात.
नवीनच लग्न झालेली एखादी जोडी पहिल्यांदाच एकत्र बाजारात आलेली असते आणि मग मग लाडे लाडे बोलत हौसेने हे घेऊ का ते घेऊ अस सुरू असतं.. त्यानिमित्ताने फक्त दोघांनाच आपला असा वेळ मिळालेला असतो ...मस्त काठपदराची साडी ,हात भरलेला चुडा, गळ्यातल नवीन मंगळसूत्र घातलेली बायको बघताना स्वतःशीच थोडा लाजत खुश होत तिला हवं ते घेऊन देत असतो..आणि बायकोही त्याच्यासाठी काही न काही घ्यायला लावत असते..

एखादी संसाराची 20-25 वर्ष बघितलेली बाई धोरणीपणाने सगळीकडच्या वस्तूंच्या दराचा अंदाज घेत फिरून झाल्यावर एखाद्या नारळ विकणाऱ्या बाईला नारळाचा दर विचारते ,आणि त्या बाईने “25 रुपयाक एक नारळ ” अस म्हटल्यावर “लै सांगतस बाय तू दर ”अस म्हणत थोडे पैसे कमी करून मिळतात का याची चाचपणी करते.आणि “बग वैनी, खेपेन सगळे घेयत असलस तर मगे कायतरी कमी करून देतंय ”अस नारळ विक्रेतीने म्हटल्यावर हळूच आपलं पैशाच पाकीट बघत “घितल असतंय गे सगळे पण एष्टीत किती गर्दी असता बगलस ना ..माका जमाचा नाय एवढा वझा न्हेवक..तू आपले दोनच नारळ दि ..”अस म्हणत दोन नारळ घेत पुढे जाते.
एखाद्या चपलाच्या दुकानासमोर एखाद जोडपं उभं असत आणि “चप्पल घेवया काय वो?” अस बायकोने विचारल्यावर नवरा पटकन चिडून म्हणतो “आत्ता खेका होया तुका ,मगे घेवया पुढच्या बाजाराक..” आणि त्यावर बायकोने “ माका नाय वो ,बायोक घेनार होतय चप्पल ..तुटत इला तेचा चप्पल शाळेत काय घालुन जायत ?” अस स्वतःच सुद्धा तुटायला आलेलं चप्पल लपवत म्हटलं की लगेच “घी घी तेका ” अस म्हणत लगेच खिशातून पैसे काढून देतो तेव्हा आपल्याला नाही मिळालं तरी पोरीला काही कमी पडू नये म्हणून तुटणार त्याच काळीज त्याच्या डोळ्यात तरळून जात क्षणभर..

“ रे बाबू टमाटे कशे किलो रे ? ”अस विचारत एखादी म्हातारा म्हातारीची जोडी ते थोडे महाग झालेत अस लक्षात आल्यावर अर्धा किलोच्या ऐवजी पाव किलोच टोमॅटो घेते आणि वाचलेल्या पैशात आणि एखादी गरजेची वस्तू कशी घेता येईल याचा विचार करत पुढे निघते..

नेहमी बाजारात येणारा एखादा म्हातारा सलगीने एखाद्या दुकानदारा शेजारी बसून त्याची चौकशी करत त्याला त्याच्या धंद्यात आपली काही मद्त होईल असं बघत असतो..
सगळी लोक आपापल्या खरेदीत व्यस्त असताना अचानकच एखादी गाय एखाद्या भाजी च्या पिशवीत तोंड घालते आणि भाजीच्या जुड्या खाऊन टाकते..आणि मग कोणी तरी रागारागात 2 फटके लावून तिला पुढे हाकलतो..
जवळ असलेल्या पैशात आवश्यक सगळ्या जास्तीत जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न करताना दहा रुपयांची चहा पावडर, 20 रुपयांची डाळ, आणि 2 किलो तांदूळ घेऊन उरलेल्या पन्नास -साठ रुपयात पूर्ण आठवड्याची भाजी कशी घेता येईल हा हिशोब करत खरेदी करणारी माणसही इथेच भेटतात…आणि या त्यांच्या बजेट मध्ये च घरातल्या एखाद्या म्हातारा/म्हातारीला लागणारी पानं आणि तंबाखू सुद्धा ऍडजस्ट होतो..
भाजी आणि फळवाल्यांसोबतच मसाले, कपडे, प्लास्टिक च्या वस्तू, भांडी, खेळणी, चुरमुरे -फरसाण अगदी जिलेबी विकणारी माणसं सुद्धा या आठवडा बाजारात असतात ..
यांच्यासोबतच अजून आवर्जून उल्लेख करावी अशी दुकान म्हणजे लेकिसुनांची आवडती कानातले ,गळ्यातली अशी हर तऱ्हेचे खोटे पण आकर्षक दागिने विकणारी दुकानं.. अगदी हातपीनेपासून ते अगदी कमरपट्टा,नेकलेस, सर्व प्रकारच्या आर्टिफिशिअल दागिन्यांपर्यंत यांच्याकडे सगळं काही उपलब्ध असतं.. प्रत्येक सणावाराला लागणाऱ्या वस्तूही त्यातच मिळतात..सध्याच्या बाजारात शाळेतल्या गॅदरिंग साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूही येतायत..
आपल्या चिमूटभर बजेट मध्ये आपल्या सगळ्या हौशी पूर्ण करता येतील अस हे बायकांचं आवडत ठिकाण...सतत कामासाठी स्वतःच्या आणि गरजेनुसार लोकांच्या शेतात ,बागेत राबणाऱ्या जीवांना हा बाजार म्हणजे जणू एक विरंगुळाच असतो..
आयुष्यात काहीवेळा पन्नास किलोमीटर च्या परिघाबाहेरच जग सुद्धा बघणं शक्य नसलेल्या लोकांना हा बाजार म्हणजे एक सहलीच ठिकाण देखील असतं म्हणायला हरकत नाही..
एखाद ग्लास उसाचा रस, किंवा बर्फ घातलेलं लिंबू सरबत, एखादा वडापाव किंवा फार तर उसळपाव ,हेच म्हणजे सगळी मज्जा .. एरवी साध्याशा मळक्या साडीत काम करणारी एखादी बाई मस्त चमचमणारी साडी नेसून छान गजरा घालून असतील तर सोन्याचे नाहीतर खोटे दागिने घालून बाजाराला जात आपली नटण्याची हौस तेवढीच पुरवून घेते.
सगळं गरजेचं साहित्य घेताना त्यातलेच पन्नास -साठ रुपये वाचवत घेतलेलं एखाद मंगळसूत्र आता पुढचे काही महिने आपलं सौभाग्य ठसठशीतपणे लोकांपुढे मिरवत राहील याची निश्चिन्ति एखादीला झालेली असते.
सकाळी आठ - साडे आठ ला बाजार भरल्या भरल्या महाग असली तरी बिना गर्दीची आणि चांगली भाजी मिळेल म्हणून जाणाऱ्या एका वर्गापासून बाजार संपताना म्हणजे अगदी दीड दोन वाजता जायला हवं म्हणजे कमी पैशात जास्त समान घेता येईल अशा वर्गापर्यन्त सगळेच मात्र या आठवडा बाजाराकडे धावत असतात आणि तोही सगळ्यांना मुक्त मनाने सगळ्यांना सामावून घेत असतो …

#उत्तराजोशी

Add comment