Paryavaran Santulan | BizBalloon
×

पर्यावरण संतुलन काळाची गरज

  नमस्कार, मी रामदास राणे मला आपल्या सर्वांच्या सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टी निदर्शनात आणून द्यायच्या आहेत आणि त्यासाठी हे एक छोटसं पाऊल. आज पूर, भूस्खलन , दुष्काळ अश्या नैसर्गिक अपत्तीचं प्रमाण वाढत आहे. दिसायला जरी या नैसर्गिक आपत्ती दिसल्या तरी मनुष्याने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचे हे सर्व परिणाम होय.
  एक माणूस म्हणून वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे जेणेकरून आपलं व आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांच भविष्य धोक्यात नसेल या संदर्भात माझ्या अभ्यासानुसार जे काही मुद्दे महत्त्वाचे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.

१) डोंगरांचे जतन करणे आवश्यक आहे:
   आपण सह्याद्रीच्या पायथ्याशी राहतो आणि हे जर डोंगर शाबूत राहिलेत तरच आपण व आपला परिसर सुरक्षित राहील. त्यासाठी सध्या असलेल्या डोंगर व झाडांची जपणूक होणं गरजेचं आहे. शेकडो वर्षांपासून अस्तित्त्वात असलेली झाडे आज आपण काही मिनिटांत कापून टाकतो. झाडांमुळेच डोंगर आणि डोंगरातील पाण्याचे स्रोत शाबूत राहू शकतात.  ५ जून २०१९ ला टाइम्स ऑफ इंडिया ने आपल्या वेबसाईटवर एक आर्टिकल पब्लिश केलेलं त्यानुसार फक्त २०१४ ते २०१८ या चार वर्षात सावंतवाडी-दोडामार्ग वाईल्डलाईफ कॉरिडॉर मधील 1600 एकर्स घनदाट जंगले पूर्णपणे तोडण्यात आलेली आहेत. पूर्ण आर्टिकल वाचण्यासाठी पुढील लींक वर जा - 1600 acres  of forest cut in key south Konkan wildlife corridor                                                
  सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही जंगल तोड पर्यावरणीय दृष्टीने अति संवेदनशील असलेल्या भागात झालेली आहे. ही जंगल तोड आशिच चालू राहिली तर पुढच्या काही वर्षात आपले डोंगर खाली होतील. झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत झाडे तोडणे म्हणजे आपली फुफ्फुसे निकामी करणे होय. शेती बागायती साठी सोडाच पण पिण्याच्या पाण्याची पण टंचाई भासेल. भूस्खलनासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागेल. 
  पूर आणि भूस्खलनापासून झाडे आपलं कसं संरक्षण करू शकतात ते बघण्यासाठी येथे क्लिक करा.
कृतीत आणण्यासारखं: १. सध्या जी जंगल तोड चालू आहे ती थांबवली पाहिजे. जंगलांचे जतन केलं पाहीजे. योग्य तिथे एकत्रित येऊन विरोध केला पाहिजे. २. प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी पूर्वक नवीन वृक्ष लागवड केली पाहीजे. ३. कुठेही फिरताना आपण वेगवेगळ्या झाडांच्या बी फेकू शकतो पावसात त्या रुजतील.
 

२) मोनो कल्चर लागवडी धोकादायक:
 मोनो कल्चर फार्मिंग म्हणजे एकाच प्रकारच्या झाडांची लागवड अनेक एकर्स मध्ये करणे होय. थोडक्यात मोनो कल्चर फार्मिंग ही हिरवी वाळवंटे आहेत. अश्या प्रकारची लागवड ही पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच धोकादायक असते. जंगल म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारची झाडे एकाच ठिकाणी वाढलेली असतात. शास्त्रज्ञांच्या मते पर्यावरणाची परिसंस्था विविधतेने नटलेली असल्यामुळेच स्थिर आहे. तीच अस्तित्त्व टिकून आहे. जंगलातील झाडांची ही विविधताच त्यांच्या सुरक्षिततेचे कारण आहे. शेकडो वर्षांपासून अस्तित्त्वात असलेली जंगले तोडून त्यात आपण अननस, काजू, आंबे, केळीसारखी छोटी झाडे लावली तर त्याचे अनिष्ट परिणाम हे पर्यावरणावर होतीलच.  
 भूकंपाच्या धक्यांची तीव्रता कमी करणे, वर्षभरासाठी पाण्याचे स्रोत जिवंत ठेवणे, अनेक प्राणी-पक्षी, जीव-जंतू यांना आहार व निवारा देणे, ऑक्सिजन चा पुरवठा करणे अश्या अनेक प्रकारे झाडे पर्यावरणाचे संतुलन करत असतात. थोडक्यात मोनो प्लॅनटेशन्स ही मुळात निसर्गाला हानिकारक आहेत. अश्या लागवडी करून फक्त व्यवसाय मोठा करायचा की असलेल्या जंगलांची जपणूक करून आपलं आणि आपल्या भावी पिढ्यांच भविष्य सुरक्षित करायचं हे आपल्याच हातात आहे. 
कृतीत आणण्यासारखं: १. मोनो कल्चर फार्मिंग ऐवजी मिश्र लागवड करू शकतो. २. सध्या असलेली झाडे न तोडता त्यातच आंतरपिकांची लागवड करू शकतो. ३. जंगलांची जपणूक करून त्यातून नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण करू शकतो.
 

३)पाण्याचे प्रवाह बदलणे थांबवलं पाहीजे:
 
आपल्या डोंगरांची निर्मिती लाखो वर्षांपूर्वी झालेली असून त्यावर असलेल्या झाडांमुळे व दगडांमुळे त्यातील पाणी एका विशिष्ट मार्गाने प्रवाहित होत असत. त्यांनाच आपण पाट किंवा छोटे वहाळ म्हणतो. हे प्रवाह गेल्या हजारो वर्षांपासून तसे वाहतात कारण डोंगरातून खाली येताना जो भाग खडकाळ व घट्ट आहे ज्याला पाणी आणखी सहज खोल करू शकत नाही अश्याच भागातून ते वाहत असतं. या प्रवाहांचे मार्ग आपण बदलले किंवा त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले तर पावसात हे पाणी जिथून वाट मिळेल तिथून बाहेर पडेल व नवीन पाट, वहाळ व दऱ्यांची निर्मिती होईल. आणि या सर्व घडामोडींमुळे पाणी व्यवस्थापनेचे नैसर्गिक संतुलन बिघडून काही भागात पाणी टंचाई किंवा काही भागात अति पाणी प्रवाहित होईल.

४) पर्यावरण संतुलन:
पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या सभोवताली असलेली जैविक (सर्व जीव - वनस्पती, प्राणी) आणि अजैविक ( हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन ) या घटकांचे आवरण होय. हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असून त्यांच्या संतुलनातूनच पोषक वातावरण तयार होते व सर्वांचे अस्तित्त्व टिकून आहे. माणूस हा बुद्धिजीव घटक असल्याने त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाचा स्वतःला हवा तसा उपयोग केला व आपला विकास साधला वेगवेगळ्या सोयी सुवीधा स्वतःसाठी निर्माण केल्या. मात्र परतफेड करण्याचे तो पूर्णपणे विसरला. 
जंगलं नाहीशी झाल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत स्थलांतरित होत आहेत तसेच खूपश्या दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत. याचा परिणाम माणसा समवेत संपूर्ण पर्यावरणावर होतो. एक रिसर्च अस सांगतो जर पृथ्वीवरून मधमाश्या पूर्णपणे नष्ट झाल्यात तर फक्त चार वर्षात मानवी जीवन संपेल. दिसायला जरी हे घटक छोटे दिसले तरी पर्यावरण संतूलनाच्या दृष्टीकोणातून त्यांचं अस्तित्त्व खूप मोलाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. निसर्गाने निर्माण केलेली कोणतीच गोष्ट ही महत्त्व नसलेली किंवा विनाकारण नाही आहे. ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निसर्गाला संतुलित करण्याचे कार्य करीत असते.

 ५)आपल्या जीवन पद्धतीत थोडासा बादल करू शकतो:
एकूणच आपल्या पृथ्वी ग्रहाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपण आपल्या जीवन पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.आपण आज ज्या वस्तू, पॅकेज फूड, कपडे वापरतो त्या बनवण्यासाठी औद्योगिकरणाची गरज असते. जास्त वस्तूंची मागणी म्हणजे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणाची गरज. वाढत्या औद्योगिकरणामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्सिडं चे प्रमाण वाढत. मागच्या 150 वर्षात संपूर्ण पृथ्वीचे सरासरी तापमान अर्धा डीग्री सेल्सिअस ने वाढलंय. वातावरणातील कार्बन चे प्रमाण 30 टक्क्यांनी तर मिथेन चे प्रमाण 140 टक्क्यांनी वाढलंय. आणि या सर्वांचे परिणाम म्हणजे अनियमित पाऊस, वणवे, चक्री वादळे, पाणी टंचाई (चेन्नई सारख्या शहरात पाण्याचे सर्व स्रोत संपुष्टात आलेत), पूर, वाढती रोगराई होय.
   बारकाईने जर विचार केला तर आपण व आपला परिसर आज धोक्यात आहे. आपण एखादी नैसर्गिक आपत्ती थांबवू शकत नाही हे जरी खरं असलं तरी जे मानवाच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे होत आहे ते तरी नक्कीच थांबवू शकतो. औद्योगिकरण पूर्णपणे बंद होणं जरी शक्य नसलं तरी आपल्या गरजांची प्राथमिकता विचारपूर्वक ठरवल्यास त्याचं प्रमाण नक्कीच कमी करू शकतो.
कृतीत अणण्यासारख: १. आपल्याला खरोखरच आवश्यक असलेल्या वस्तू घेणे. २. पेट्रोल डिझेल चा वापर कमी करणे. गरज असेल तेव्हाच फिरणे. ३. पर्यावरणाला पोषक असतील अश्या व्यवसायायांची निर्मिती करणे.

 ६. जागरूकता:
 
वरील सर्व गोष्टींबद्दल आपण स्वतः जागरूक बनून इतरांना जागरूक करणे अत्यंत गरजेचे आहे. काही लोकांच्या चुकीच्या किंवा स्वार्थी कृतींमुळे जरी हे पर्यावरणात बदल घडत असले तरी निसर्गाचा प्रकोप होईल तेव्हा चांगल्या-वाईट, स्वार्थी-परमार्थी सगळ्याच लोकांना याचा फटका सहन करावा लागेल. आपण इंटरनेटचा वापर व्हाट्स ऍप आणि फेसबुक पुरता मर्यादित न ठेवता या संदर्भात माहिती मिळविण्यासाठी किंवा जागरूकता वाढविण्यासाठी करू शकतो. या संदर्भात इंटरनेटवर वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांचे अनेक विडिओ व आर्टिकल उपलब्ध आहेत. गूगल किंवा इतर सर्च इंजिन वर पुढील शब्द सर्च करून त्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.
Deforestation / Global warming / Climate change / Carbon emissions side effects / Temperature increase / Sea level rise 
  आपण जर स्वतः च्या आणि इतरांच्या चुकांमधून नाही शिकलो आणि निसर्ग शिकवेल याची वाट बघत राहिलो तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला सहन करावे लागतील कारण निसर्गाची शिकवण्याची पद्धत घातक असू शकते. जर मनुष्य आपली पूर्ण बुद्धी वापरून एवढा विकास करू शकतो तर निसर्ग संतुलनाचा विषय गांभीर्याने घेतल्यास तो त्यातही नक्कीच यशस्वी होईल. आणि सर्वात महत्त्वाचे पर्यावरणाच्या संतुलनातून साधलेला विकास हा नक्कीच चिरकाल टिकणारा असेल कारण हा विकास पर्यावरण पोषक असेल.

७. १० ऑगस्ट, २०१९ रोजी तरुण भारत मध्ये शेखर सामंत यांनी भूगर्भ शास्त्रज्ञ  एम. के. प्रभू यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

८. 25 ऑगस्ट, २०१९ रोजी शेखर सामंत यांचा तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचण्यासाठी येथे येथे क्लिक करा. 

 

सदर माहिती वाचण्यास आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद.

आपल्या जवळ या संदर्भात काही माहिती असल्यास किंवा या संदर्भात काही शंका असल्यास संपर्क करू शकता.

रामदास राणे                                                                                       
8275809993

ramdaasrane@gmail.com

Add comment