माझ्या आठवणीतील कोकणी माणसं !! | BizBalloon
×

माझ्या आठवणीतील कोकणी माणसं !!

malvani
Malvani Diaries
sindhudurg
kokan

 


“पूर्वी नव्हती हो पोरांची ही अशी टांगलेली खाणी..कुरकुरे आणि वेफर्स म्हणे...सगळा काय ता “पाच रुपये ...पाच रुपये..”पोर आपली धावतायत दुकानावर..मग जेवतील कशास घरात? आमटीभात गोड थोडाच लागणारे? मग आयशी धावतायत बाबू जेव रे म्हणून पाठून ...आमची पोर अशी असती तर वेळेवर नदीवर पोचवावे लागले असते आम्हास...पण तेव्हा अशी आवशी बापाशीकडे पैसे मागायची हिम्मत नव्हती ,बापसान तंगड्या तोडून हातात दिल्यानं असत्या …”
खूप दिवसांनी परवा अस बोलणं कानावर पडलं आणि नकळत हसू फुटलं..हे अस फटकळ पण तरीही गोड वाटणारं बोलणारी माणस खूप मागे राहिल्याची जाणीव पटकन होऊन गेली…


माझं लग्न ठरलं तेव्हा माझी पणजी ऍडमिट होती.. तेव्हा तिला भेटायला मी आणि माझा नवरा दोघ हॉस्पिटल ला गेलो होतो ; “गो लग्नाच्या आधीच मज भेटायस घेऊन आलास की काय जावयास ?” असा प्रश्न तिने विचारलेला आठवला ..तिच्या काळाच्या दृष्टीने लग्ना आधी मुला मुलीने भेटणं म्हणजे केवढतरीच मोठं असेल कदाचित ..पण त्या विचारण्यातही कौतुकच जाणवलं आम्हाला ..
“ गो पोरानो , काय थंड पाण्यात न्हायचा असेल ते आपापल्या घराकडे जाऊन न्हावा ,इथे नको ..उद्या तुमच्या आयशी माझ्या नावानं बोंबलतील ताप काढलात तर ” ...अस म्हणत आमच्या पाठून फिरणारी आमची आजी आम्ही आजोळहून निघताना मात्र तिच्या पत्र्याच्या लहानशा डब्यातून काढून प्रत्येकाच्या हातावर पैसे ठेवायची आणि “हेचा काय ता घे हो तुज आवडेल ते .. आणि आयशीस पिडू नकोत गो ..मदत करा जमेल तशी..आणि आता परत कधी येशील?” अस म्हणत पाणावल्या डोळ्यांनी आमची पाठवणूक करायची ..पुढच्या सुट्ट्या सुरू होताच कुठल्यातरी मावशीला ती आम्हाला घेऊन यायला पाठवणारच हे आम्हाला कोणी न सांगताही माहीत असायचं..
फटकळ पणा हा इथल्या कोकणी माणसाच्या नसानसात भरलेला ..तोंडानं भले शिव्या देतील पण मनात प्रेमच …


रस्त्याने काहीतरी वात्रटपणा टिवल्याबावल्या करत जाणाऱ्या एखाद्या मुलाला सहजपणे “मेल्या कशास मरतोयस ,जीव नको झालाय की काय तुज?..चालता हो आधी घराकडे नायतर तंगड्या तोडून ठेवीन ” अस सांगणारी माणस इथली ..या बोलण्यात त्याच काही वाईट व्हावं हा हेतू कधीच नाही पण बोलायची पद्धत मात्र अशी ..
कालमान परिस्थिती नुसार आता कोकणातल्या लोकांची भाषाही थोडी बदलत चाललीय ..बऱ्याच अंशी लोक प्रमाण मराठी कडे वळले.. ही अशी थोडीशी गावठी वाटणारी पण कानाला गोड वाटणारी बोली मागेच पडत चाललीय ...ती बोलणारी लोकही हळूहळू काळाच्या ओघात नकळत हात सोडून निघतायत पुढच्या प्रवासाला..आणखी दहा-पंधरा वर्षांनी हे अस हक्काचं दटावणं उरणार नाही कदाचित…..डोळे आत्ताच पाणावतायत कल्पनेने सुद्धा …..


#उत्तराजोशी


 

Add comment