वेंगुर्ल्या मध्ये अनुभवण्यासारखा गोष्टी | BizBalloon
×

वेंगुर्ल्या मध्ये अनुभवण्यासारखा गोष्टी

वेंगुर्ल्या मध्ये अनुभवण्यासारख्या गोष्टी

 

सिंधुदुर्गातील आणखी एक निसर्गरम्य, समृद्ध आणि शांतिमय ठिकाण  म्हणजे वेंगुर्ला. मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी या महत्वाच्या तालुक्यांना वेंगुर्ला जोडलेलं आहे. वेंगुर्ल्यातील   डोंगर-दऱ्यांनी, समुद्र किनार्यांनी व देवस्थानांनी एक वेगळच महत्त्व वेंगुर्ल्याला प्राप्त करून   दिलय.

 

वेंगुर्ला जेट्टी बंदर:

काही शतकांपूर्वी १६०० ते १८०० च्या दरम्यान  अतिशय व्यावसायिक वर्दळीच हे एक महाराष्ट्रातील महत्त्वाचे बंदर होते. अजूनही हे ठिकाण पर्यटकांची गर्दी असलेले वेंगुर्ल्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. या बंदरावर सूर्यास्त चे दिसणारे  नयनरम्य दृश्य बघण्यासाठी संध्याकाळी गर्दी असते. संध्याकाळी बऱ्याच मच्छिमारांच्या बोटी मासेमारी  करून बंदरावर परतलेल्या असतात. रोज संध्याकाळी बंदरावरच मासे विक्री केली जाते. त्यामुळे ताजे व स्वस्त मासे विकत घेऊ शकता.  बंदराला लागूनच  स्नॅकसाठी , जेवणासाठी व राहण्यासाठी सुद्धा चांगले पर्याय उपलब्ध आहेत. बंदरापासून काही मिनिटांच्या अंतरावर वेंगुर्ला लाईट हाऊस आहे.

 

समुद्र किनारे :

वेंगुर्ला हे लांबलचक, शुद्ध, डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या समुद्र किनाऱ्यांसाठी  प्रसिद्ध आहे. येथील समुद्र किनारे तुम्हाला  एक वेगळाच अनुभव देतील हे नक्की.

 

अतिशय कमी गर्दी असलेले किनारे: कोंडुरा किनारा,  वायंगणी किनारा, रेडी किनारा, निवती किनारा, मोचेमाड किनारा. खरोखरच तुम्हाला काही वेळ एकांतात घालवायचा असेल तर  वेंगुर्ल्यातील या किनाऱ्यांपैकी कोणत्याही किनाऱ्याला  अवश्य  द्या. येथे बऱ्याच वेळा स्थानिक लोकांशिवाय कोणीच नसत. फक्त समुद्र आणि तुम्ही.

 

कमी गर्दी असलेले किनारे : आरावली सागरतीर्थ किनारा, सागरेश्वर किनारा, खवणे किनारा हे किनारे कमी गर्दी असलेले आहेत. आरवली सागरतीर्थ किनारा तर खूप लांबलचक किनारा  आहे. किनाऱ्यावर संध्याकाळी गर्दी असते.  

 

जास्त गर्दी असलेले  किनारे: शिरोडा वेळागर किनारा इतर किनाऱ्यांपेक्षा जास्त गर्दी असलेला सागर किनारा आहे. येथे तुम्हाला स्नॅक साठी पर्याय आहेत. राहण्यासाठी सुद्धा समुद्र किनार्याच्या आसपास पर्याय आहेत. किनाऱ्या सभोवतालचे वातावरण रम्य व तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावणार आहे.


 

देवस्थाने :

रेडीचा गणपतीआरावली चा वेतोबा हि वेंगुर्ल्यातील जागरूक देवस्थानांपैकी दोन महत्वाची देवस्थाने होय.

रेडीचा गणपती हा द्विभुज गणपती आहे. प्रत्त्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थी ला येथे भक्तांची गर्दी असते. नेहमी सुद्धा वर्दळ असतेच.

वेतोबा मंदिर आरावली हे शिरोडा-वेंगुर्ला सागरी मार्गावर आहे. हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध आणि जागरूक देवस्थान आहे अशी येथील स्थानिकांची व भक्तांची श्रद्धा आहे. या मंदिरातील वेतोबाची मूर्ती भव्य असून ती पंच धातूंनी बनवली आहे व तिची उंची ९ फूट २ इंच आहे.  हे मंदिर १६६० मध्ये बांधण्यात आहे होते. वेतोबाला केळ्यांचा प्रसाद देतात व चामड्याच्या चप्पलांचा नवस केला जातो.

 

वेंगुर्ला फ्रुट रिसर्च केंद्र :

जर तुम्हाला शेती व फळ उत्पादन या विषयी आवड असेल तर या केंन्द्राला नक्कीच भेट द्या. इथे वेग वेगळ्या प्रकारच्या फळांचे उत्पादन व संशोधन केले जाते. काजू, चिकू, आंबा अश्या अनेक फळांच्या वेगवेगळ्या प्रजाती तुम्हाला बघायला मिळतील. हा परिसर काही मैलांवर पसरलेला आहे. येथे रोपवाटिका सुद्धा आहे व रोपे विक्री साठी उपलब्ध असतात. तेथे काजू प्रक्रिया युनिट आहे व या युनिट मधून तुम्हाला काजू प्रक्रिये बद्दल माहिती दिली जाते.

 

Add comment